Godavari

प्रवाह आणि प्रतिबिंब

सवयी, स्थिती आणि स्वास्थ्य असे काही मूलभूत प्रश्न घेऊन ८-१० वर्षांपूर्वी पुण्यातील एका मानसोपचारतज्ज्ञांकडे मी गेलो होतो. दैनंदिन जीवनातील पेच आणि त्यात गुरफटलेल्या सामान्य माणसाला समुपदेशनाची मदत होऊ शकते हे अजून सुद्धा समाजाला तितकंसं मान्य नाही. अर्थात बदल घडतोय आणि आजच्या जगण्यातील अनिश्चितता आणि अस्थिरता लक्षात घेता समुपदेशन हि काळाची गरज होणार ह्यात शंका नाही, आणि त्यात लाज अथवा संकोच वाटण्याजोगे नक्कीच नाही. असो, पहिल्या सत्रात माझ्या मानतील शंका ऐकून घेतल्यावर डॉक्टरांनी मला काही मूलभूत चाचण्या करायला सांगितल्या, त्यात एक इंक-ब्लॉट टेस्ट होती.

टेस्ट सुरु करण्याआधी मला सांगण्यात आले कि; “तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही सांगा, ह्यात चूक-बरोबर असे काही नाही”. त्या नंतर मला काही आकृत्या दाखवण्यात आल्या आणि प्रत्येक आकृती पाहिल्यावर मला त्यात काय दिसते असे विचारण्यात आले. बहुतेक आकृत्या मला पेल्विक-बोन सारख्या वाटत होत्या तर काही आकृत्या मला खेकड्या सारख्या किंवा नाकतोड्या सारख्या वाटल्या. टेस्ट घेताना डॉक्टर माझ्याकडे निर्विकारपणे (पोकर फेस) बघत होते.

शेवटच्या सत्रात डॉक्टरांनी, झालेली चर्चा आणि टेस्ट रिपोर्टच्या साहाय्याने, मला मोजकेच असे मार्गदर्शन केले आणि रिपोर्टवर, “your aspirations are big, but you lack the resources to achieve those, consider further training & development in chosen domain.” असा शेरा मारला. किंचित टोचणारा जरी असला तरी तो शेरा योग्य होता, पुढील प्रवास माझा मलाच करायचा होता तर त्यासाठी लागणारी तयारी सुद्धा मलाच करणे आले. पण खरंतर हे माझे मला कळत नव्हते का?

इंक-ब्लॉट च्या आकृत्यांमध्ये मला दिसलेले चित्र आणि त्यातून माझ्या मनस्वास्थाबद्दल चे तज्ज्ञांचे निकष हा एक वैद्यकीय शास्त्राचा भाग झाला. पण एरवी आपण स्वतःला कितपत ओळखतो? आपल्या स्वताःबद्दलच्या कल्पना कितपत अचूक असतात? का ते केवळ आपल्याच दृष्टिकोनातून निर्माण केलेले एक अभिमानी स्वरूप असते? The delta between how we see ourselves and how people perceive us indicates the level of our self-awareness. तेंव्हा स्वताःला समजायचं असेल तर आधी स्वताःची ओळख हवी आणि ओळख व्हायला शोध घ्यायला हवा.

स्वयंशोधाच्या अशाच एका प्रवासाची, नव्हे प्रवाहाची गोष्ट आहे, गोदावरी.

प्राजक्त देशमुख लिखित आणि निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी हा मराठी चित्रपट मला त्या इंक-ब्लॉट टेस्ट सारखाच गूढ, कठीण पण तरी सुद्धा एक वैयक्ति प्रतिबिंब दर्शविणारा वाटला. ऍबस्ट्रॅक्ट आर्टचा पुष्कळ अभ्यास असलेले जाणकार ह्या चित्रपटातून काही निराळे निकष काढतील, मुळात निर्मात्यांना काही विशिष्ठ भाष्य करायचे असेल, पण सामान्य दर्शकाला ज्याच्या त्याच्या वृत्तीनुसार आकलन होईल आणि ते अचूक असले नसले तरी महत्वाचे असेल असे मला वाटते. असो, मला जेवढे समजले, जाणवले ते असे…

रूपक कथा आणि पटकथा हे ह्या चित्रपटचे दोन काठ आणि ह्या मधून खळ-खळ वाहणारी कथा म्हणजे गोदावरी. साचेबद्ध आयुष्याला वैतागलेल्या निशिकांत आणि त्याच्या आयुष्यातील काही प्रसंगांमुळे उलगडत जाणारा त्याचा स्वयंशोधाचा प्रवास आपल्याला पटकथेत दिसतो. ठराविक चौकटीत वावरणे निशीला मंजूर नाही आणि म्हणून त्याने आपल्यापरीने एक छोटे बंड केले आहे. पण हे बंड पोकळ आणि वरवरचे आहे हे त्याला ठाऊक आहे. नाईलाज म्हणून त्याने ह्या जगण्याशी एक प्रकारे तडजोड केली आहे आणि हि तडजोड त्याला बोचते, त्याची घुसमट होत आहे. आपल्या नातलगांवर, समाजावर, परिसरावर आणि निरंतर वाहणाऱ्या गोदावरीवर त्याचा राग आहे. ह्या कोंडीमुळे, घुस्मटिमुळे त्याच्या आयुष्यात एक पेच निर्माण होतो आणि काही अनुभवांना त्याला सामोरे जावे लागते. निशिकांत त्याच्या आयुष्याला कसे सामोरे जातो, त्याचा सीमित दृष्टिकोन कालांतराने व्यापक होतो का, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.

निशिकांतच्या आयुष्यातील घुसमट आणि राग व त्यातून अधून मधून डोकावणारी विकृती आणि नैराश्य हे उभे करणे जितेंद्र जोशी यांना कठीण नाही हे आपण जाणतोच. पण मध्यंतरा नंतर त्याला आलेले अनुभव, त्यातून झालेले भवानीक बदल आणि यथावकाश आलेला सुजाणपणा त्यांनी अतिशय सौंवेदनशीलपणे मांडला आहे आणि त्यात त्यांचा अभिनयाची खरी ताकद जाणवते. आईच्या भूमिकेत नीना कुलकर्णी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने आपल्याला साद घालतात. किंचित विचित्र, विक्षिप्त वाटणारे आणि सदैव अबोल असणारे बाबा, संजय मोने यांनी सहजी सादर केले आहेत. प्रियदर्शन जाधव यांनी निशिकांतच्या मित्राची भूमिका केली आहे आणि मोजके प्रसंग असले तरी त्यात ते छाप पडून जातात. गौतमीच्या भूमिकेत गौरी नलावडे हिने सुरेख काम केले आहे. तिच्यातला सय्यम, माया, काळजी आणि तिची स्वतःची मानसिक कोंडी तिने सुंदररित्या मांडली आहे. निशिकांतच्या चिमुकल्या निरागस मुलीच्या भूमिकेत छोट्या सानिया भंडारेचे काम कौतुकास्पद आहे.       

गोदाकाठचा परिसर आणि काळ-ऋतू नुसार होणारे बदल हे छायाचित्रकाराने अप्रतिमरित्या टिपले आहेत. गोदाकाठच्या नाशिकचे एक वेगळेच रूप आप्ल्यायला बघायला मिळते. पार्श्वसंगीत, वेशभूषा, संवाद आणि एकंदरीत चित्रपटाच्या सर्वच तांत्रिक बाजू सक्षम आहेत आणि हे पैलू चित्रपटाला वेगळी उंची देतात. थोडी वेगळी वाट निवडणारा आणि धीम्या गतीने उलगडणारा चित्रपट असला तरी निदान मला तरी तो कंटाळवाणा वाटला नाही, निशिकांतचा प्रवास कुठवर आणि कसा होणार ह्याची उत्कंठा शेवटपर्यंत टिकून होती ह्यात पटकथेचे यश आहे.

रूपक कथेत शिरायचे का नाही आणि शिरायचे तर कुठवर हे प्रत्येकाला ठरवावे लागेल. कारण इंक-ब्लॉट प्रमाणे प्रत्येकाला त्याच चित्रात निराळी अनुभूती येऊ शकते, येणारच.

चित्रपटात अनेक ठिकाणी काही प्रतीकात्मक दृशे दिसतात आणि त्यातील काहींचा उलगडा होतो तर काही अनुत्तरित वाटतात. जुनाट वाड्याच्या खिडक्या आणि त्यातून दिसणारी गोदा हे दृशे अनेकदा दिसते. आजोबांचे खिडीतून बघणे, सरिताचे डोकावणे, घराला खिडक्या हव्यात हा आईचा हट्ट आणि कशाला हव्या आहेत खिडक्या हा निशीचा फेर प्रश्न हे प्रसंगी बुचकळ्यात टाकणारे वाटते. निळकंठरावांचे (बाबा) लायब्ररी मध्ये निघून जाणे, अबोला असणे हे देखील बराच काळ खटकते. अखेर त्यांच्या लायब्ररी मधले ‘House without windows’ हे पुस्तकाचे शीर्षक एका क्षणात बरंच काही सुचवून जाते. चित्रपटाच्या शेवटी होणार पिता-पुत्र सौंवाद ह्या सगळ्या भावनांचा उलगडा करून जातो.

नदीकाठी फुगे विकणारा केविलवाणा बाप आणि नदीच्या दूषित पाण्यात अमृतानुभव घेणारा उत्तरभारतीया इसम, निशिकांतच्या स्वयंशोधला सहाय्यक ठरतात. तसेच कासव दादाचे खडे बोल आणि त्यानंतर होणारे अहंकार रुपी रावण दहन निशिकांत मध्ये परिवर्तन आणते. ह्या दृशांमधील मतितार्थ सगळ्यांना पोहचेलच असे नाही पण त्याचे सादरीकरण नेटके आहे. निशिकांतचा आई सोबतचा सौंवाद त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल मोठे विधान करतो, त्याचा संदर्भ चित्रपटाच्या शेवटाला येतो आणि तो नक्कीच गोंधळात टाकणारा आहे.

नदीचा प्रवाह, तिच्या तीरावर नांदणारी मानव वस्ती आणि त्यांच्या चालीरीती ह्यांचे एक अतूट नाते आहे. निसर्ग आणि मनुष्य मुळात वेगळे नाहीत आणि असतील तरी एकमेकांवर अवलंबून आहेत, तेंव्हा नदी कडून किती घायचे (ओरबाडायचे) आणि नदीला काय द्यायचे (वाहायचे) ह्याचा विचार करायला कथा अप्लायला भाग पाडते. गोदावरीला आपण क्षणभर समाजरुपी प्रवाह म्हणलं, तर आपण एका तीरावर अलिप्त राहून आपल्या सोईनुसार उपभोगणे योग्य, का तो प्रवाह ओलांडून पैलतीरी जाणे योग्य, कि त्या प्रवाहात एकरूप होणे अधिक साजेसे हे सुद्धा पडताळणे आलेच. आपण समजाकडून जितके घेतो त्याहून अधीक देणे लागतो ह्याचे भान असावे हे चित्रपट आपल्याला सुचवून जातो.

मात्र सगळ्यात जास्त विचारात टाकणारे रूपक म्हणजे निशिकांतचे स्वास्थ्य आणि त्यापासून उद्भवलेला पेच. निशिकांतचा आजार शारीरिक आहे कि मानसिक, त्याच्यातून तो पूर्ण बारा होतो का नाही आणि त्याच्या उपचारा मधे गोदावरीच्या पाण्याचे नेमके काय योगदान आहे ह्याचे एकच अचूक उत्तर नाही, it is open to interpretation.

एक गोष्ट मात्र नक्की, निशिकांतचा आणि ओघा ओघाने आपल्या सर्वांचा स्वयंशोध यशस्वी व्हायची इच्छा असेल तर अलिप्त, कोरडे राहून ते शक्य नाही. जेंव्हा मारुतीच्या आणि आपल्या पायाला गोदेचे पाणी लागेल, तेंव्हाच स्वयंशोध शक्य होईल. गोदावरीचे पाणी कितीही अस्वच्छ असले तरी ते अपवित्र कधीच नाही, आपले कवचरुपी कपडे त्यागून आणि कृत्रिम मुखवटे भिरकावून गोदामाईच्या कुशीत शिरलो तर ती आपल्याला जे प्रतिबिंब दाखवेल ते प्रखर व स्पष्ट असेल.   

बरं आणि पाण्यात उतरायची तयारी नसेल तर मात्र इंक-ब्लॉट किंवा तत्सम चाचण्या केल्या शिवाय गत्यंतर नाही. शेवटी प्रवास आपल्याला करायचा आहे तेंव्हा तयारी पण आपल्यालाच करावी लागणार.

Leave a comment